मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्टतर्फे 'एम्पॉवेरिंग हर फ्युचर' उपक्रमांतर्गत 1000 बालिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 'सुकन्या समृद्धी योजना व एनपीएस वात्सल्य' अंतर्गत ₹2 कोटींच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे. पाश्चात्त्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचे वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज आहे. भारतीय संस्कृतीने नेहमीच सभ्य, सुसंस्कृत आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा पुरस्कार केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः मुलींना शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी शाळा उभारण्याची आणि ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या 100 वर्षांत हजारो-लाखो मुलींनी अनेक शैक्षणिक संस्थांमधून शिक्षण घेतले असून त्या आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. मुलींच्या मुखातून सादर होणारी समृद्ध स्तोत्रे ही भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठ परंपरेचे प्रतीक आहे. पाश्चात्य विचारसरणी स्पर्धा आणि सामर्थ्याला महत्त्व देते, तर भारतीय संस्कृती प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा आणि प्रगती करण्याचा समान अधिकार मानते. समाजातील सक्षम घटकांनी दुर्बलांसाठी संधी आणि आधारव्यवस्था निर्माण करणे हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळखअसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
ज्या राष्ट्रांनी महिलांना शिक्षण, कौशल्य आणि समान संधी दिली, ती राष्ट्रे प्रगतीच्या शिखरावर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेश देत महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाला राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप दिले. जगातील ज्या राष्ट्रांनी महिलांना शिक्षण, कौशल्य आणि समान संधी दिली, ती राष्ट्रेच प्रगतीच्या शिखरावर पोहोचली. भारतीय इतिहासात ज्या काळी महिलांचा सन्मान झाला, त्या काळात देश समृद्ध झाला. महिला सक्षमीकरणाच्या विचारातून केंद्र शासनाने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.
या उपक्रमाअंतर्गत एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्टच्या वतीने 10 वर्षांखालील मुलींची 'सुकन्या समृद्धी योजना' आणि 10 वर्षांवरील मुलींची 'एनपीएस वात्सल्य योजना' अंतर्गत नोंदणी करण्यात आली. मुलींच्या शिक्षणाला आणि भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेला बळ देणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत 1000 खात्यांमध्ये प्रत्येकी ₹20,000 जमा करण्यात आले असून पुढील 10 वर्षे दरवर्षी तेवढीच रक्कम जमा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शिक्षणाच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहिलेल्या प्रत्येक युवक-युवतीने समाजातील गरजू आणि वंचित घटकांना मदतीचा हात द्यावा. समाजात खऱ्या अर्थाने महान तोच असतो, ज्याच्या मनात देण्याची वृत्ती असते. माणूस संपत्ती नव्हे, तर आपली चांगली कृत्ये मागे ठेवून जातो. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे. शिक्षण, आर्थिक समावेशन आणि सातत्यपूर्ण पाठबळाच्या माध्यमातून मुलींना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. अशा प्रकारचे उपक्रम राज्य शासनाच्या प्रत्येक मुलीला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि सर्वसमावेशक भविष्य घडविण्याच्या प्रयत्नांना बळ देणारे आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव भंडारी यांच्या सामाजिक बांधिलकीचे विशेष कौतुक केले. एका व्यक्तीच्या दृढ संकल्पातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. वंचित मुलींच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे अभिनंदन करत, समाजहितासाठी त्यांचे कार्य भविष्यातही अशाच समर्पित भावनेने सुरू राहावे, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार राम कदम, मोनार्क नेटवर्थ कॅपिटल लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव भंडारी, एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्टचे विश्वस्त मीना खेतानी व पियुष अवलानी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.