'एल्डर लाईन १४५६७' ठरतेय ज्येष्ठांसाठी हक्काचा आधार

'एल्डर लाईन १४५६७' ठरतेय ज्येष्ठांसाठी हक्काचा आधार
  • Positive News
  • ऑक्टोबर 22 2026

Share on  

'एल्डर लाईन १४५६७' ठरतेय ज्येष्ठांसाठी हक्काचा आधार

 "घरात आम्ही दोघेच एकटे, मुलगा परदेशात...", "नातेवाईकांनी घर बळकावलेय...", तर "कुटुंबात संवादच उरलेला नाही..." अशा एकाकीपणा, कौटुंबिक कलह आणि विविध समस्यांनी ग्रासलेल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता हक्काचा आधार मिळाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेली 'एल्डर लाईन १४५६७' ही राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन ज्येष्ठांच्या व्यथांवर फुंकर घालण्याचे महत्त्वपूर्ण काम करत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत या हेल्पलाईनवर तब्बल ४ लाखांहून अधिक कॉल्स आले असून, ३० हजारांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष धाव घेऊन ज्येष्ठांना मदत पुरवण्यात आली आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (भारत सरकार), राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य शासन यांच्या सहकार्याने ही राष्ट्रीय हेल्पलाईन देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविली जात आहे.

 महाराष्ट्रात याउपक्रमाची धुरा 'जनसेवा फाउंडेशन, पुणे' ही संस्था सांभाळत आहे. 

“मानवसेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद मानून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा (MD) यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेल्या ३७ वर्षांपासून वंचित, आजारी व वृद्धांच्या सेवेसाठी अविरत कार्यरत असून संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाचा (UN) विशेष दर्जाही प्राप्त आहे. ऑगस्ट २०२१ पासून राज्यात या हेल्पलाईनची यशस्वी अंमलबजावणी सुरू आहे.

हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख मोफत सेवा :
 माहिती सेवा: आरोग्य, पोषण, निवारा, वृद्धाश्रम आणि डे-केअर सेंटरबाबत आवश्यक ती सर्व माहिती एका फोनवर उपलब्ध करून दिली जाते.

 कायदेविषयक व प्रशासकीय मार्गदर्शन : ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याण अधिनियम २००७, पेन्शन योजना, मालमत्ता वाद तसेच कौटुंबिक कलहाच्या प्रकरणात मोफत कायदेशीर सल्ला दिला जातो.

 भावनिक व मानसिक आधार : वाढत्या वयातील चिंता, मानसिक ताण, नैराश्य व राग व्यवस्थापनासाठी समुपदेशन पुरवले जाते.

 प्रत्यक्ष मदत व पुनर्वसन : बेघर तसेच अत्याचारग्रस्त वृद्धांची सुटका, कुटुंबीयांशी संवाद घडवून समेट घडवणे आणि पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून कायदेशीर संरक्षण देणे.
'एल्डर लाईन १४५६७' ही केवळ एक साधी हेल्पलाईन नसून ज्येष्ठांसाठी सुरक्षित आधार आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग ठरत आहे. 
समाजातील प्रत्येक घटकाने या उपक्रमाबाबत जागरूक राहून गरजू व एकाकी ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही सेवा पोहोचवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संबंधित बातम्या