नाशिक : भारताच्या अंतर्गत गुप्तचर यंत्रणेचे (Intelligence Bureau – IB) नवे संचालक म्हणून नाशिकचे डॉ. महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून ते विद्यमान संचालकांच्या कार्यकाळानंतर पदभार स्वीकारतील.
डॉ. महेश दीक्षित कोण आहेत?
डॉ. महेश दीक्षित हे 1993 बॅचचे IPS अधिकारी असून त्यांना आंध्र प्रदेश कॅडर मिळाले होते.
त्यांनी सुरुवातीचे शिक्षण नाशिकमधील रंगूबाई जुन्नरे शाळेत घेतले.
पुढे आर. वाय. के. (RYK) महाविद्यालय, नाशिक येथे उच्च शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी एम.डी. (मानसोपचारशास्त्र) ही वैद्यकीय पदवी संपादन केली. डॉक्टर म्हणून करिअर करण्याची संधी असतानाही त्यांनी नागरी सेवेत प्रवेश करून IPS अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
कारकीर्द
आंध्र प्रदेशमध्ये नक्षलग्रस्त भागात प्रभावी कामगिरी केल्यानंतर त्यांची नियुक्ती इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये झाली.
त्यांनी काश्मीरमध्ये जवळपास आठ वर्षे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि दहशतवादविरोधी व अंतर्गत सुरक्षा विषयक कामात उल्लेखनीय योगदान दिले.
ईशान्य भारतातील संवेदनशील राज्यांमध्ये, विशेषतः नागालँड परिसरातही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
नियुक्तीपूर्वी ते IB चे स्पेशल डायरेक्टर या दुसऱ्या क्रमांकाच्या वरिष्ठ पदावर कार्यरत होते.
इंटेलिजन्स ब्युरो (IB) ही भारताची सर्वात जुनी आणि प्रमुख अंतर्गत गुप्तचर संस्था आहे. देशांतर्गत सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाया, गुप्त माहिती संकलन आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील बाबींमध्ये IB ची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. अशा संस्थेच्या सर्वोच्च पदावर , विशेषतः नाशिकच्या अधिकाऱ्याची नियुक्ती ही राज्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.