एसटी महामंडळाचा डिजिटल निर्णय !! एसटीच्या 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' योजनेचा लाभ आता घरबसल्या!

एसटी महामंडळाचा डिजिटल निर्णय !! एसटीच्या 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' योजनेचा लाभ आता घरबसल्या!
  • Positive News
  • ऑक्टोबर 3 2026

Share on  

एसटी महामंडळाचा डिजिटल निर्णय !! एसटीच्या 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' योजनेचा लाभ आता घरबसल्या!


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या 'आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' योजनेतील पास आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन सुविधेमुळे प्रवाशांना आता आगारात जाऊन हस्तलिखित पद्धतीने पास काढण्याची आवश्यकता उरणार नाही, तर त्यांना घरबसल्या ऑनलाइन पास मिळवता येणार आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या ४ आणि ७ दिवसांच्या पाससाठी ऑनलाइन कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप्लिकेशनवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ऑनलाइन पास काढताना प्रवाशांना आवश्यक माहिती भरल्यानंतर नियमानुसार पास मिळणार असून, हा पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ (PDF) स्वरूपात दाखवता येणार आहे, ज्यामुळे पास खरेदीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ झाली आहे.

या डिजिटल पासवर एक क्यूआर कोड (QR Code) देण्यात येणार असून, प्रवासाच्या वेळी वाहकाकडील ईटीआयएम मशीनद्वारे हा कोड स्कॅन केला जाईल. कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशाचे नाव, पासचा प्रकार, वैधता व इतर माहिती मशीनवर दिसून येईल. तसेच ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतरच प्रवाशाला प्रवासाची परवानगी दिली जाईल. या ऑनलाइन पास सुविधेमुळे प्रवाशांना आगारात रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही, विशेषतः सुट्टीच्या काळात आणि पर्यटनाच्या हंगामात पास काढणे अधिक सोपे होणार आहे. 

आवडेल तेथे कोठेही प्रवास पास' योजनेचे डिजिटल रूपांतर केल्यामुळे एसटीचा प्रवास अधिक सुलभ, आधुनिक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

संबंधित बातम्या