पोलीसांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त दर्जेदार सदनिकांची निर्मिती 

पोलीसांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त दर्जेदार सदनिकांची निर्मिती 
  • Positive News
  • ऑगस्ट 18 2025

Share on  

पोलीसांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त दर्जेदार सदनिकांची निर्मिती 

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कोल्हापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज पोलीस संकुलाच्या नूतन इमारतीचे व कुरुंदवाड पोलीस ठाणे (ऑनलाईन) ता. शिरोळ येथील नूतन इमारतीचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी पोलीस संकुलातील संबंधित लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्यांचे प्रतिकात्मक वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री यांनी यावेळी सदनिकांची पाहणी करून समाधान व्यक्त करत या सदनिका दर्जेदार झाल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच कुरुंदवाड येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या नुतन इमारतीचेही मुख्यमंत्री यांनी ऑनलाईन उदघाटन केले. या इमारतीच्या उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या अभियंत्यांचा, बांधकाम कंत्राटदार यांचा सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. सर्व सोयींनी युक्त असे 168 सदनिका बांधण्याकरिता राज्य शासनाकडून सुमारे ₹34 कोटी 62 लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित (मुंबई) यांच्यामार्फत या संकुलात एकूण A,B,C अशा 7 मजली 3 इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येकी 538 चौरस फूट क्षेत्राच्या 2 बीएचकेच्या 56 सदनिका अश्या एकूण 168 सदनिका बांधण्यात आलेल्या आहेत. याठिकाणी लिफ्टची सोय, गार्डन एरिया, तसेच प्रशस्त पार्किंग, मुलांसाठी प्लेग्राउंड, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, सोलर सिस्टिम, अग्निशामक, मंदिर, एसटीपी प्लांट अशा सोयी तसेच 24 तास संरक्षणाचे काम करणाऱ्या पोलीस अंमलदारांकरीता विसाव्यासाठी सुंदर कॅम्पसची निर्मिती करण्यात आली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या