बदलते हवामान,वाढते वायुप्रदूषण: घशाला खवखव, खोकल्याचे रुग्ण वाढले!

बदलते हवामान,वाढते वायुप्रदूषण: घशाला खवखव, खोकल्याचे रुग्ण वाढले!
  • Positive News
  • ऑक्टोबर 22 2026

Share on  

बदलते हवामान,वाढते वायुप्रदूषण: घशाला खवखव, खोकल्याचे रुग्ण वाढले!

मुंबई :-   बदलते हवामान, दिवसा प्रचंड उकाडा, वाढते वायुप्रदूषण यांचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये घशातील खवखव, कोरडेपणा, जळजळ, कोरडा खोकला आणि आवाज बसण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खासगी व सरकारी रुग्णालयांत श्वसनमार्गाशी संबंधित त्रास घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. 
      विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि ॲलर्जीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सध्या ऋतुबदलाचा परिणाम जाणवत असून तापमान आणि हवेतील आर्द्रतेत चढ-उतार होत आहेत. या बदलांमुळे श्वसनमार्गाच्या संवेदनशीलतेवर परिणाम होऊ शकतो. घशात कोरडेपणा जाणवणे, खवखव आणि बोलताना त्रास जाणवणे, अशी सुरुवातीची लक्षणे दिसतात. काहींना सर्दी किंवा ताप नसतानाही सतत खोकला येत आहे.
      प्रदूषणातील सूक्ष्म कण ठरताहेत त्रासदायक
वातावरणातील बदलांसोबतच शहरातील वायुप्रदूषणाचाही श्वसनसंस्थेवर परिणाम होत आहे. रस्त्यांवरील धूळ, वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि बांधकामांच्या ठिकाणांहून हवेत पसरणारे सूक्ष्म कण यांमुळे घसा आणि श्वसनमार्गाला त्रास होऊ शकतो. प्रदूषित हवेमुळे आधीपासून ॲलर्जी, दमा किंवा श्वसनविकार असलेल्या रुग्णांचा त्रास वाढण्याची शक्यता असते. काही वेळा घशातील जळजळ आणि खोकल्यामुळे रात्रीची झोपही विस्कळीत होते.
मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात वाहतुकीची वर्दळ आणि बांधकामांमुळे धुळीचा संपर्क टाळणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी तसेच लहान मुलांना शाळेत सोडण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

घशाची काळजी कशी घ्याल ? 

घशातील खवखव आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे, कोमट पाण्याने गुळण्या करणे आणि धुळीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते. थंडपेये आणि आइस्क्रीममुळे त्रास वाढत असल्यास त्यांचे सेवन टाळावे. वातानुकूलित यंत्रणेचा अतिवापर करू नये. घरातील हवा स्वच्छ ठेवणे, धूळ साचू न देणे आणि संतुलित आहार घेणेही महत्त्वाचे आहे.
       दिवाळीला अजून वेळ असून वातावरण आणखी खराब होण्याची शक्यता आहे. सध्या खोकल्याच्या रुग्णांना लक्षणानुसार औषधे दिले जात आहेत. काही वेळा अँटिबायोटिक्सची गरज भासते. खोकला दीर्घकाळ टिकत असल्यास, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असे डॉ. जलील पारकर, श्वसनविकार तज्ज्ञ, लीलावती रुग्णालय यांनी सांगितले .
       वातावरण बदलाचा आणि हवेतील  गुणवत्ता खराब असल्याचा  हा परिणाम आहे. सध्या ओपीडीमध्ये येणाऱ्यांपैकी अनेकांना ताप, तीव्र खोकला, श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. धुळीचे बारीक कण श्वसनाद्वारे शरीरात येतात. अनेक वेळा यामुळे कोरडा खोकला होतो. घसा लाल होतो.  या काळात आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास या समस्यांपासून सहज बचाव करता येऊ शकतो असे डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, जे. जे. रुग्णालय यांनी सांगितले .
 

संबंधित बातम्या