वांगे – एक औषधी भाजी! | वांग्याचे आरोग्यदायी फायदे
वांग्याला अनेक घरांमध्ये ‘सामान्य भाजी’ समजलं जातं, पण खऱ्या अर्थाने ते एक औषधी भाजीपाला आहे. वांग्याच्या विविध जाती, खास करून डोरलं, पांढरं, काटेरी, गावरान वांगे, यामध्ये पोषणमूल्ये तर असतातच, पण काही विशिष्ट आजारांवर त्याचे उपाय म्हणूनही उपयोग होतात.
1) वांग्याचे भरीत – आरोग्यदायी आणि झोपेसाठी उपयुक्त
डोरलं वांग भाजून, त्यावर मिरपूड, हिंग, सैंधव टाकून केलेले भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ले, तर ते पचन सुधारते, भूक लागते. झोप न येणाऱ्यांसाठी आणि पोटदुखी, पोट फुगणे यांसाठी हे भरीत फायदेशीर आहे. तेल टाकू नये, कारण त्यामुळे ते जड होते.
2) ताप व खोकल्यात उपयोगी भाजी
ताजी वांगी वाफवून, त्यात सैंधव आणि आले टाकून बनवलेली भाजी तोंडाला चव देते, कफ कमी करते आणि आम दोष कमी होतो. तापात मऊ भातासोबत ही भाजी खूप गुणकारी आहे.
3) मुळव्याधीवर उपयोगी उपाय
पांढऱ्या वांग्याचे सेवन मुळव्याधीच्या रुग्णांना मदत करते. भाजून फडक्यात बांधून शेक केल्यास सूज आणि वेदना कमी होतात – पण ही प्रक्रिया काळजीपूर्वक करावी.
4) झोपेसाठी वांग्याचे पान उपयोगी
वांग्याच्या पानांचा रस २ चमचे खडीसाखरेसोबत घेतल्यास झोप चांगली लागते.
5) जड शरीर किंवा अशक्तपणा यावर
वांगे खाल्ल्याने शरीरातील मेद कमी होतो. अशक्त लोकांनी नियमित खाल्ले, तर शक्ती वाढते. काही ठिकाणी गाठींवर भाजलेले वांगे लावण्याची पद्धतही आहे.
6) शुक्रधातू वृद्धीसाठी उपयुक्त
वांगे हे शुक्रधातू वाढवणारे आहे. यामुळे पुरुषांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
एका शेतकरी बंधूला वृषणवृद्धीचा त्रास होता. त्याला वांग्याचे मूळ उगाळून लेप देण्याचा सल्ला दिला. काही दिवसांत फरक जाणवला. वांग्याचे मूळ आणि गावरान वांगे यामध्ये नैसर्गिक औषधी गुण असतात.
आपण गावरान वांग्याची मागणी वाढवल्यास, शेतकरी त्याची लागवड करतील आणि शुद्ध, औषधी वांगे आपल्याला मिळेल.