दररोज एकच नाश्ता करून कंटाळा आला आहे का? मग आज काहीतरी वेगळं करून पाहा! ब्रेड वडा हा असा नाश्ता आहे जो झटपट तयार होतो आणि सगळ्यांच्या आवडीचा ठरतो. पारंपरिक मेदूवड्याला हा एक स्वादिष्ट पर्याय ठरू शकतो. सकाळच्या धावपळीच्या वेळेत हा वडा अगदी कमी वेळेत तयार होतो आणि मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. नारळाच्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा — त्याची चव प्रत्येकाच्या मनात घर करून जाईल.
आवश्यक साहित्य
ब्रेड स्लाईसेस – ४ ते ५
तांदळाचे पीठ – ¼ कप
रवा – ३ टेबलस्पून
उकडलेला बटाटा – १
दही – १ कप
बारीक चिरलेला कांदा – १ टेबलस्पून
चिरलेल्या हिरव्या मिरच्या – २
आले पेस्ट – ¼ टीस्पून
कढीपत्ता – ८ ते १० पाने
कोथिंबीर – २ ते ३ टेबलस्पून
जिरे – ½ टीस्पून
ठेचलेली काळी मिरी – ¼ टीस्पून
तेल – तळण्यासाठी
मीठ – चवीनुसार
कृती
सर्वप्रथम ब्रेडचे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
एका भांड्यात हे ब्रेडक्रम्स घेऊन त्यात तांदळाचे पीठ आणि रवा घालून चांगले मिसळा.
उकडलेला बटाटा सोलून मॅश करा आणि ब्रेड मिश्रणात घालून एकत्र करा.
आता त्यात दही, कांदा, मिरच्या, आले पेस्ट, कोथिंबीर आणि कढीपत्ता घाला.
त्यात जिरे, ठेचलेली मिरी आणि मीठ टाकून सर्व मिश्रण मऊसर करून घ्या.
हाताला थोडं तेल लावून लहान-लहान वडे तयार करा आणि एका प्लेटमध्ये ठेवून घ्या.
कढईत तेल गरम करून हे वडे सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
सर्व वडे तयार झाल्यावर चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
सकाळच्या घाईत झटपट तयार होणारा हा ब्रेड वडा तुमचा दिवस खास करून टाकेल. चवीत नव्हे तर सोप्या तयारीतही तो ‘सुपरहिट’ ठरेल!
(Disclaimer: हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कृतीतील घटक किंवा प्रमाण आपल्या चवीनुसार बदलता येतात.)