गणेशोत्सवात 'डीजे' बाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची मोठी भूमिका ! म्हणाले...

गणेशोत्सवात 'डीजे' बाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची मोठी भूमिका ! म्हणाले...
  • Positive News
  • ऑगस्ट 30 2026

Share on  

गणेशोत्सवात 'डीजे' बाबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांची मोठी भूमिका ! म्हणाले...


पुणे : 'गणेशोत्सवात 'डीजे'चा कर्णकर्कश आवाज, ध्वनिवर्धकांच्या भिंती, लेझरचे झोत आणि प्रेशर मिडचा वापर करण्यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. पुणे शहरासह राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवात स्पीकर असले पाहिजे, कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी फिरू नका अशी भूमिका घेतली आहे.

गणेशोत्सवात डीजे, प्लाझ्मा वापरामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट न्यायालयात धाव घेत या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुणे शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या समर्थनार्थ अनेक नागरिकांनी गणेशोत्सवात स्पीकरच्या भिंती नको अशी मागणीही केली आहे.

शहरातील विविध राजकीय पक्षांनी यावर भूमिका घेतली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गणेशोत्सवात डीजे चा आणि प्लाझ्माचा कर्णकर्कश आवाजाचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात डीजे सह लेझरचे झोत, प्रेशर मिडचा वापर कटाक्षाने टाळला पाहिजे. कायद्याने घालून दिलेल्या ध्वनिमर्यादांचे पालन करूनच उत्सव साजरा केला पाहिजे,' अशी भूमिका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे. 'पारंपरिक ढोल-ताशांवर अनावश्यक निर्बंध लादू नयेत,' अशी सूचना त्यांनी केली.

'गणेशोत्सव हा केवळ कार्यकर्त्यांचा नव्हे, तर लोकांचा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवात लोकसहभाग वाढविताना नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही भूमिकांतून मी या उत्सवाकडे पाहतो,' असे मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

भाजपचे काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी 'डीजे'ला समर्थन देत असल्याबाबत ते म्हणाले, 'संबंधित लोकप्रतिनिधींची भूमिका पूर्णपणे दाखविली जात नाही. नगरसेवक बापू मानकर यांनी 'उत्सवाला फार बंधने नकोत' असे म्हटले होते; मात्र 'डीजेला परवानगी द्या, अन्यथा गणपती बाहेर काढणार नाही' असे कोणतेही वक्तव्य त्यांनी केले नाही.'

'डीजे'चा मुद्दा केवळ गणेशोत्सवापुरताच उपस्थित करण्याऐवजी वर्षभर होणाऱ्या सण, उत्सव, जयंती आणि पुण्यतिथी अशा कार्यक्रमांसाठीदेखील ध्वनिमर्यादा लागू असल्या पाहिजेत. नागरिकांना त्रास होईल, अशा पद्धतीने कोणताही उत्सव साजरा केला जाऊ नये. माझ्या मंडळाचा मी ३० वर्षे अध्यक्ष आहे. या काळात एकाही मिरवणुकीत ध्वनिवर्धक वाजलेले नाहीत. आम्ही नियम पाळतो. मंडळाचे कार्यकर्ते समजूतदार आहेत,' असेही मोहोळ म्हणाले.

नेपाळमध्ये अडकलेल्यांंसाठी मदतकार्य सुरू

'नेपाळमधील पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील रहिवाशांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची २४ तास कार्यरत असलेली यंत्रणा आणि दिल्लीतील नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील पथकाच्या माध्यमातून मदतकार्य सुरू आहे. अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाइकांकडून संपर्क झाल्यास त्यांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असे मोहोळ यांनी सांगितले.
 

संबंधित बातम्या