वसंत व्याख्यानमालेत मांडल्या 21 व्या शतकातील प्रेरणादायी यशोगाथा
नाशिक : बेरोजगारी आणि व्यवसाय संधींचा आढावा घेतला असता, दक्षिण आफ्रिका आपल्याला साद घालत आहे. जगात सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या पहिल्या दहापैकी सहा शक्ती आफ्रिकेत आहेत. परंतु ही शक्ती आजही मनुष्यबळासाठी झगडत आहेत. हीच आपल्यासाठी खरी संधी आहे. असे प्रतिपादन टांझानिया आणि द. आफ्रिकेतील प्रख्यात कॉर्पोरेट नेतृत्व रत्नाकर वाघ यांनी येथे केले.
गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज मैदानावर सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत श्री. वाघ यांनी 9 वे पुष्प गुंफताना थोर स्वातंत्र्य सैनिक स्व. सदुभाऊ भौरे स्मृती व्याख्यानात 'गोदावरीपासून जागतिक महासागरापर्यंत : भारत, आफ्रिका आणि 21 व्या शतकातील नव्या संधी' या विषयावर मार्गदर्शन केले.
केसिंगटन क्लबचे विक्रांत मते, शैलेश भोरे, हर्षल भोरे, एमएसएल ड्राईव्ह लाईनचे हेमंत राख, माजी जिल्हाधिकारी बी. जी. वाघ व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. सदुभाऊ भोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. ज्ञानेश चोपडे यांच्या हस्ते पाहुण्यांना सन्मानित करण्यात आले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
दरम्यान, व्याख्यानस्थळी शलाका मोहगावकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यांचाही यावेळी सत्कार झाला. प्रमुख पाहुण्यांसह दर्दी नाशिककरांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट देत मनसोक्त दाद दिली.
श्री. वाघ म्हणाले की, परंतु आपल्याकडे आफ्रिकेबद्दल मोठे गैरसमज आहेत. त्याला तत्कालीन परिस्थिती कारणीभूत असली तरी 21 शतकात हे चित्र बदलले आहे. नोकरीच्या संधींसाठी द. आफ्रिका आपल्याला साद घालत असल्याचे सांगून त्यांनी भारत आणि द. आफ्रिका या दोन्ही देशांतील संबंधांचा ब्रिटिश काळापासूनचा ईतिहास चित्रफितीच्या माध्यमातुन उलगडला. भारतात कौशल्य आणि टॅलेंट खुप वेगाने वाढत आहे. मात्र त्यांना सामावून घेणारी यंत्रणा उपलब्ध नाही, असे सांगत त्यांनी भारतातील बेरोजगारीचाही आढावा घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी भारतातून आफ्रिकेत जाऊन यश मिळवणाऱ्या काही युवकांच्या प्रेरणादायी यशोगाथा चित्रफितीद्वारे मांडल्या. त्याचप्रमाणे तेथील विविध क्षेत्रातील आकडेवारीसह वस्तुस्थितीचा आढावाही त्यांनी घेतला. युवकांप्रमाणेच भारतीय युवती आणि महिलांना असलेल्या संधींचाही त्यांनी उहापोह केला. सोशल मीडिया, कण्टेण्ट क्रियेटर आदींबरोबरच शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रांतही महिलांना प्रचंड संधी असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. अशा पार्श्वभूमीवर आफ्रिकेत भारतीयांना खुपच मागणी असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे तेथील अनेक धोरणं, बाजारपेठ, स्पर्धेचा अभाव आदीमुळे व्यवसायाच्याही खुप संधी असल्याचे सांगताना ते म्हणाले की 1995 मध्ये भारताची जी परिस्थिती होती, ती आज आफ्रीकेची आहे. फार्मास्यूटीकल, शिक्षण, कुरिअर, कृषी प्रक्रिया अशा तब्बल 12 प्रकारचे क्षेत्र भारतीय तरुणांची वाट बघत आहे. त्यामुळे भिती बाळगण्याचे कारण नाही. भाषेचाही फारसा अडसर नाही अशा अनेक बाबींचा आपण अवश्य विचार करायला हवा असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
---
*सदाबहार तुम मुझे यूँ...*
व्याख्यानानंतर एमएसएल कराओके क्लब प्रस्तुत 'तुम मुझे यूं भूला ना पाओगे' ही बहारदार गाण्यांची मैफल रंगली. रसिकांना जुन्या आठवणींत खिळवून ठेवणाऱ्या या मैफलीत गायक हेमंत राख, नितीन भोपळे, मधुकर साळवे, विजय चव्हाण, शंकर निचित, कल्पेश कलोरे, दिपक चव्हाणके, कुणाल कुलकर्णी, मीनल नवले आणि छोटू वाडेकर यांनी सहभागी होत अत्यंत लोकप्रिय व कर्णमधूर गाणी सादर केली.
---
*आजचे (दि. 10) व्याख्यान*
1) वक्ते : सरिता कौशिक (संपादक एबीपी माझा)
विषय : महाराष्ट्र, राजकारण आणि समाजभान
2) अफलातुन म्यूझिकल ग्रुप प्रस्तुत 'गोल्डन मेलोडिज'
3) चित्रप्रदर्शन : प्रतिभा अहिरे