'भाकरीचा चंद्र'ने अधोरेखित केले संपूर्ण कामगार विश्व 

'भाकरीचा चंद्र'ने अधोरेखित केले संपूर्ण कामगार विश्व 
  • Positive News
  • मे 21 2026

Share on  

'भाकरीचा चंद्र'ने अधोरेखित केले संपूर्ण कामगार विश्व 

वसंत व्याख्यानमालेत सुर्वे यांच्या कवितांचा जागर

नाशिक : महाराष्ट्राचे सुर्वे मास्तर अर्थात ख्यातकीर्त कवी नारायण सुर्वे यांच्या कविता श्रमिकांच्या व्यथा मांडतात. ह्या व्यथा सर्वकालिन आहेत. त्यामुळे या कविता नेहमीच समकालीन वाटतात. या कवितांमधून त्या काळातील कोलाहल आजच्या काळातही जाणवतो, अशी मांडणी करत 'भाकरीचा चंद्र' या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून  आज वसंत व्याख्यानमालेत सुर्वे यांच्या कवितांचा जागर करण्यात आला. गिरणी कामगारांच्या व्यथाच नव्हे तर अवघ्या कामगार विश्वाचेच यथार्थ चित्रण अधोरेखित करण्यात आले.

नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या 103 वर्षांच्या परंपरेत सोमवारी ख्यातकीर्त कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'भाकरीचा चंद्र' हा विशेष कार्यक्रम झाला. स्व. माधवराव लिमये स्मृती व्याखानाअंतर्गत झालेल्या या कार्यक्रमाचे संहिता लेखन दत्ता पाटील यांनी, तर दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले. तर राजेंद्र ऊगले, अरुण इंगळे, राम वाणी, विक्रम नन्नावरे व श्रद्धा देशपांडे यांनी हा कार्यक्रम सादर केला.
सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते पद्मश्री  नारायण सुर्वे आणि स्व. माधवराव लिमये यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.  व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. सुरेश पवार, सुदाम सातभाई, अशोक पाटील, नंदकुमार देशपांडे, नथुजी देवरे, शरद वाघ यांनी स्वागत केले. दरम्यान, व्याख्यानमालेनिमित्त राबविण्यात येत असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या उपक्रमात आज वीजल बोरसे यांनी आपल्या कलाकृती सादर केल्या. विशेषतः व्यक्तीचित्रांवर आधारित या कलाकृती रसिक नाशिककरांना मनापासून आवडल्या. यामध्ये लोकमान्य टिळक यांच्यापासून तर मंत्री दादा भुसे यांच्यापर्यंत अनेक मान्यवरांची चित्रे त्यांनी रेखाटली. श्री. बोरसे यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, विषमतेत जगणारी सगळीच माणसं सारखीच असतात हा विचार सुर्व्यांनी त्या काळात त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच पात्रांद्वारे  आपल्या कवितांमधून मांडला आहे. त्यांची भाषा, आशयगर्भता, कामगारांची तत्कालीन व्यवस्था, वेश्या वस्तीतील जगणं, मागास आणि दलित वर्गाचं जगणं आदी सारं काही अत्यंत मार्मिक शब्दांत मांडणारे नारायण सुर्वे हे त्यामुळेच खऱ्या अर्थाने सामाजिकतेचे जिवंत  चित्रण करणारे चित्रकार ठरतात. 'भाकरीचा चंद्र' या शीर्षकातच  या संपूर्ण परिस्थितीचं चित्रण आलेलं आहे. संपूर्ण कार्यक्रमात मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या 'लोकल ट्रेन' चा आवाज असलेले संगीत आणि कवितांबरोबरच त्यांच्या जीवनातील अनेक भावगर्भ प्रसंगांची पेरणी या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. दिग्दर्शक श्री. शिंदे यांनी निवेदनासोबतच विविध प्रसंग सांगुन प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
---
*'सुशीर संवाद'द्वारे सकस मनोरंजन*
दुसऱ्या सत्रांत सुहास वैद्य प्रस्तुत 'सुशीर संवाद' हा एक अनोखा संगितमय कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये श्री. वैद्य यांच्या सहकाऱ्यांनी बासरी वादनाद्वारे नाशिककरांना मंत्रमुग्ध केले. या अत्यंत सुरेल आणि अनोख्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शास्त्रीय संगीतापासून तर आधुनिक काळातील विविध गाण्यांचा श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला.
---
*आजचे (दि. 21) व्याख्यान*
1) वक्ते : सचिन जाधव (चित्रपट दिग्दर्शक 'तेंडल्या
विषय : स्वप्नांचा पाठलाग करताना 
2) सूरज बारी प्रस्तुत 'भावस्पर्श' 
3) चित्रप्रदर्शन : कलानिकेतन महाविद्यालय, नाशिक

संबंधित बातम्या