दिवाळीच्या सणाआधी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महाराष्ट्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. या कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. दिवाळीपूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांच्या हाती ही रक्कम देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या योजनेचा राज्यातील एकूण २ लाख १४ हजार ९७ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्यासाठी शासनाने ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील बालकांच्या पोषणासाठी आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही त्या पार पाडतात. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या या कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जावी, या उद्देशाने भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. यापूर्वी अंगणवाडी सेविकांच्या पर्यवेक्षिका पदावरील पदोन्नतीसाठीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता भाऊबीज भेट जाहीर झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी हा आणखी एक महत्त्वाचा निर्णय ठरला आहे.