नागोया : जपानमधील नागोया येथे २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला शनिवारी रंगारंग आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेल्या उदघाटन सोहळ्याने सुरुवात झाली. मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियममध्ये झालेल्या दोन तासांच्या सोहळ्यात जपानची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि 'एक आशिया'चा संदेश यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला.
जपानचे सम्राट नारुहितो यांनी स्पर्धेचे औपचारिक उदघाटन केले. सम्राज्ञी मासाको, आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे (ओसीए) अध्यक्ष शेख जोआन बिन हमाद अल थानी आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) अध्यक्ष कस्र्टी कोव्हेंट्री यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. जपान तिसर्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.
'हार्मोनिक हार्ट बीट' ही उद्घाटन सोहळ्याची मध्यवर्ती संकल्पना होती. नागोया येथे जन्मलेले दिग्दर्शक युकिहिको त्सुत्सुमी यांनी सोहळ्याचे दिग्दर्शन केले. विविध देशांतील खेळाडू, त्यांच्या संस्कृती आणि परंपरा यांना एका समान लयीत जोडण्याचा प्रयत्न या संकल्पनेतून करण्यात आला. हृदयाच्या आकारातील भव्य रंगमंच हा सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. 'अवेकनिंग ऑफ द स्पेस अँड द रेझोनटिंग हार्ट बीट' या स्वागत कार्यक्रमाने सोहळ्याची सुरुवात झाली. प्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार तारो हाकासे यांच्या संगीतासह प्रकाशझोत, तसेच लेझर लाइटने स्टेडियम उजळून निघाले. हृदयाच्या आकाराचे पंख असलेल्या ड्रोनच्या सादरीकरणानेही समारंभाला वेगळीच रंगत आणली. आयची-नागोया परिसरातील सुमारे २४० नागरिक नर्तकांनी चार रंगांच्या गटांत सादरीकरण केले.
पारंपरिक काबुकी रंगमंचाच्या रचनेसह मोठ्या औद्योगिक रोबोटिक आर्मने ध्वज फडकावण्याचे दृश्य सादर करण्यात आले. आयची प्रांताची औद्योगिक आणि तांत्रिक क्षमता त्यातून अधोरेखित झाली. जपानी ध्वजवंदन आणि राष्ट्रगीतानंतर खेळाडूंचे संचलन सुरू झाले. पारंपरिक जपानी कलाविष्कार, संगीत आणि आधुनिक दृश्य-श्राव्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जुन्या आणि नव्या जपानचे दर्शन घडवण्यात आले. उदघाटन सोहळ्यापूर्वी जपानच्या हवाई संरक्षण दलाच्या 'ब्लू इम्पल्स' पथकाने नागोयाच्या आकाशात विशेष हवाई प्रात्यक्षिक सादर केले.
क्विम्सीला 'कांस्य'ची संधी
उदघाटन सोहळ्यापूर्वीच काही स्पर्धा सुरू झाल्या असून भारताच्या क्विम्सी डिसूझाला टेकबॉल क्रीडा प्रकाराच्या उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या सुमायाकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे तिचे 'सुवर्ण' यशाचे स्वप्न भंगले. मात्र, टेकबॉलमध्ये भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक जिंकवून देण्याची क्विम्सीकडे अजूनही संधी आहे. आज, रविवारी ती कांस्यपदकासाठी खेळणार आहे.
४५ देश, ११ हजारांहून अधिक खेळाडू
पुढील १५ दिवस आशियातील ४५ देशांतील ११ हजारांहून अधिक खेळाडू ४३ मुख्य क्रीडा प्रकार आणि ७१ उप-प्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत. एकूण ४६९ सुवर्णपदकासाठी स्पर्धा होणार असून, स्पर्धेची सांगता ४ ऑक्टोबरला होईल. उदघाटन संचलनात आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या निर्वासित पथकातील दोन खेळाडू सहभागी झाले. यजमान जपानचा ताफा परंपरेनुसार अखेरीस मैदानात दाखल झाला.
तजिंदरऐवजी सेहरावत ध्वजवाहक
दोन ऑलिम्पिक पदकविजेती नेमबाज मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाने उदघाटन संचलनात सहभाग घेतला. मूळ नियोजनानुसार गोळाफेकपटू तजिंदरपालसिंग तूर आणि मनू यांची ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, समारंभासाठी आवश्यक अधिकृत पोशाख वेळेत उपलब्ध न झाल्याने अखेरच्या क्षणी तजिंदरच्या जागी पवन सेहरावतची निवड करण्यात आली.
भारतीय ॲथलेटिक्स पथक
१३ सप्टेंबरपासून त्सुकुबा येथे सराव शिबिरात होते. स्पर्धेच्या वेळापत्रकामुळे खेळाडू नागोयाला उशिरा पोहोचणार असल्याने त्यांनी समारंभाचे पोशाख बरोबर नेले नव्हते. याच कारणास्तव तजिंदरचा समारंभाचा पोशाख शनिवारी दुपारी नागोया विमानतळावर पोहोचला. तो घेऊन उदघाटन सोहळ्यास्थळी वेळेत पोहोचणे शक्य नसल्याने तजिंदरने सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.