मुंबई : ‘ओंकार भजन मंडळी’चा 21 वा वर्धापनदिन उत्साहात!भाईंदर-दादर लोकलमध्ये देवी दुर्गेला 56 भोगांचा नैवेद्य; भजन, पूजा आणि आरतीने डबा झाला भक्तिमय
मुंबईची लोकल म्हणजे धावपळ, गर्दी आणि रोजच्या प्रवासाचा अविभाज्य भाग. मात्र याच धावत्या लोकलमध्ये भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. भाईंदरहून दादरकडे जाणाऱ्या सकाळी 10:20 वाजताच्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये ‘ओंकार भजन मंडळी चॅरिटेबल ट्रस्ट’चा 21 वा वर्धापनदिन भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमासाठी मंडळीच्या सदस्यांनी आपल्या घरून विविध खाद्यपदार्थ आणि प्रसाद आणला होता. देवी दुर्गेच्या प्रतिमेसमोर 56 भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर धावत्या लोकलमध्ये पूजा, भजन आणि आरती करण्यात आली. या उपक्रमामुळे नेहमी गजबजलेल्या लोकलच्या डब्यात काही काळ आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनीही या सोहळ्याचा आनंद घेत सहभाग नोंदवला.