आषाढ तळण: परंपरेला चवदार सलाम!

आषाढ तळण: परंपरेला चवदार सलाम!
  • Positive News
  • जून 29 2025

Share on  

आषाढ तळण: परंपरेला चवदार सलाम!

हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस ‘साजरा’ करण्याचे काही ना काही निमित्त असते. ते निमित्त रूढी-परंपरेतून आलेले असते, तर कधी ऋतूनुसार शरीर-मनाला पोषक ठरणारे असते. त्यापैकीच एक चविष्ट आणि आनंददायी परंपरा म्हणजे आषाढ तळण, ज्याला काही ठिकाणी "आखाड तळणे" असाही उल्लेख आहे.

२०२५ मध्ये आषाढ मासाची सुरुवात २६ जूनपासून झाला आहे. हा काळ म्हणजे पावसाची चाहूल, आर्द्र हवामान आणि थोडी वाढलेली भूक! याच काळात शरीराला उष्णता देणारे, पचायला जड पण रुचकर तळलेले पदार्थ खाण्याची परंपरा आहे.

परंपरेचा हेतू काय?

पावसाळ्यात आहारात थोडा बदल होतो. हवेत ओलावा वाढतो आणि शरीराचा जठराग्नी काहीसा मंदावतो. अशावेळी तळलेले पदार्थ पचायला जड असले, तरी ते पोट भरवणारे, चविष्ट असतात आणि भूकही भागवतात. त्यामुळे निसर्गच आपल्याला या दिवसांत थोडी मोकळीक देतो, हे समजून घ्या – अर्थात, प्रमाणातच!

या काळात अनेक पारंपरिक तळणीचे पदार्थ तयार केले जातात. त्यात गोड-तिखट पुऱ्या, शेव, चकल्या, खारे शंकरपाळे, पुडाची वडी, अळूवडी, कोथिंबीर वडी, भजी यांचा समावेश असतो. या सगळ्यात खास लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे – तिखट मिठाच्या चटपटीत पुऱ्या.

 पारंपरिक तिखट मिठाच्या पुऱ्या – कृती

साहित्य

  • जिरे, बडीशेप, धने, ओवा – प्रत्येकी १ चमचा

  • लसूण – ६ पाकळ्या

  • हिरव्या मिरच्या – ४-५

  • गव्हाचे पीठ – २ वाट्या

  • बेसन – अर्धी वाटी

  • कोथिंबीर – बारीक चिरून

  • हळद, तिखट – प्रत्येकी १ चमचा

  • मीठ – चवीनुसार

  • पांढरे तीळ – थोडेसे

  • तळण्यासाठी तेल

कृती

  1. सर्वप्रथम जिरे, बडीशेप, धने, ओवा, लसूण व मिरच्या थोड्या पाण्यात वाटून घ्या.

  2. एका परातीत गव्हाचे पीठ, बेसन, कोथिंबीर, हळद, तिखट, मीठ, तीळ व तयार वाटण घालून एकत्र करा.

  3. त्यात दोन मोठे चमचे गरम तेल (मोहन) घाला.

  4. गरजेनुसार पाणी घालून मऊसर पण घट्ट कणिक भिजवा.

  5. मोठी पोळी लाटून वाटीने छोट्या पुऱ्या कट करा.

  6. गरम तेलात मध्यम आचेवर पुऱ्या खरपूस तळा.

  7. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा – ८ दिवस मस्त टिकतात!

 आषाढ तळण – फक्त चवच नव्हे, तर आठवणींचा महोत्सव!

या तळणीमध्ये माहेरच्या आठवणी असतात, पारंपरिक स्वाद असतो आणि कुटुंबाला एकत्र आणणारा सणभाव असतो. आजही या परंपरेचा सन्मान ठेवत आधुनिक पदार्थही यात सामील होत आहेत.

अस्वीकरण (Disclaimer):

वरील लेखात दिलेले सर्व आहारसंबंधी उपाय हे पारंपरिक माहितीनुसार सांगितलेले आहेत. कुठलाही पदार्थ खाण्याआधी तुमच्या शरीरसंपत्ती, वैद्यकीय अडचणी किंवा पथ्य यानुसार डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. तळलेले पदार्थ प्रमाणात खाल्ले, तरच ते लाभदायक ठरतात.

चविष्ट आषाढ तळणाच्या शुभेच्छा! 

 

 

 

संबंधित बातम्या