महाराष्ट्र-मेघालय मैत्रीचा नवा अध्याय, नवी मुंबईत मेघालय भवनाची पायाभरणी

महाराष्ट्र-मेघालय मैत्रीचा नवा अध्याय, नवी मुंबईत मेघालय भवनाची पायाभरणी
  • Positive News
  • ऑगस्ट 9 2026

Share on  

महाराष्ट्र-मेघालय मैत्रीचा नवा अध्याय, नवी मुंबईत मेघालय भवनाची पायाभरणी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई येथे नवीन मेघालय भवनाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून मेघालय सरकारकडे नवी मुंबई येथील भूखंडाचे हस्तांतरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी नवीन मेघालय भवनाची पायाभरणी केली.

महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील मेघालय ही केवळ दोन राज्ये नसून, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारी सहोदर राज्ये आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र आणि मेघालय यांच्यातील सांस्कृतिक व आर्थिक नाते अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. नवी मुंबई, ठाणे आणि रायगडचा संपूर्ण परिसर देशाच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेला मोठी गती देणार असून, हाच परिसर भारताच्या विकासाचे पुढील मुख्य केंद्र ठरणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ईशान्य भारतातील विद्यार्थी, कलाकार आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांसाठी मुंबई व पुणे ही अत्यंत पसंतीची ठिकाणे आहेत. विशेषतः मेघालयच्या आत्म्यामध्ये वसलेल्या संगीताचा मुंबईच्या संगीत जगताशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यामुळेच खारघरसारख्या मोक्याच्या ठिकाणी आकारास येणारे हे मेघालय भवन केवळ एक इमारत नसून, मेघालयातून शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी किंवा कला सादरीकरणासाठी येणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांसाठी हक्काचे घर ठरेल.

नवी मुंबई परिसरात होत असलेल्या अभूतपूर्व विकासाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या भागात जागतिक दर्जाच्या 12 अव्वल विद्यापीठांचा समावेश असलेली ‘एज्यु-सिटी’ आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘मेडी-सिटी’ उभारली जात आहे. सोबतच देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता याच परिसरात निर्माण होत असून, हे क्षेत्र न्यू-एज आणि डीप-टेक उद्योगांचे केंद्र बनत आहे. पुढील काळात मेघालयचे नागरिक या वास्तूचा वापर करतील, तेव्हा या नियोजित आणि भविष्याभिमुख जागेचे महत्त्व त्यांना जाणवेल. मेघालय भवनाचे बांधकाम लवकरात लवकर आणि उत्कृष्ट दर्जात पूर्ण करण्यासाठी सिडको किंवा राज्य सरकारच्या यंत्रणांमार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेघालयचे माजी मुख्यमंत्री व लोकसभेचे माजी अध्यक्ष स्व. पी. ए. संगमा यांच्या संसदेतील अतुलनीय योगदानाचे स्मरण केले. अत्यंत खडतर राजकीय परिस्थितीतही चेहऱ्यावर हास्य ठेवून त्यांनी देशाची संसद कुशलतेने चालवली. त्यांचाच वारसा पुढे नेत मेघालयचे तरुण व गतिमान मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी गेल्या 6 ते 7 वर्षांत मेघालय राज्याची अर्थव्यवस्था दुप्पट केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगमा यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. केवळ या भवनापुरते मर्यादित न राहता, येत्या काळात महाराष्ट्र आणि मेघालय ही दोन्ही राज्ये संस्कृती आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत परस्पर सहकार्याने अधिक वेगाने पुढे जातील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मेघालयचे उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टाइनसॉन्ग, मेघालयचे मंत्री सोस्थनीज सोहटन, खासदार मिलिंद देवरा, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या