मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'चे उदघाटन केले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसित नागरिकांना मिळणारी घरे, उद्योगांसाठीची जागा तसेच भविष्यातील सामाजिक पायाभूत सुविधांचे प्रत्यक्ष आणि डिजिटल दर्शन घडविणाऱ्या पीएमजीपी कॉलनी, एच ब्लॉक, बीकेसीजवळ उभारलेल्या या अत्याधुनिक सेंटरची पाहणीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. या सेंटरमध्ये आधुनिक दृकश्राव्य आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धारावीच्या वर्तमानापासून भविष्यातील स्वरूपापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला आहे.
‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’मध्ये नागरिकांना केवळ पुनर्निर्माण प्रकल्पाचे आराखडे पाहायला मिळणार नाहीत, तर त्यांच्या भविष्यातील घराचा, परिसराचा आणि कामाच्या ठिकाणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. त्यामुळे अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून पुनर्विकासाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धारावी ही केवळ झोपडपट्टी नाही. ती एक मोठे आर्थिक इंजिन आहे. येथे कुंभारवाड्यातील मातीभांडी उद्योग, चामड्याचा व्यवसाय, अन्नप्रक्रिया, प्लास्टिक पुनर्चक्रीकरण तसेच अन्य लघु-मध्यम उद्योगांमधून मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. या उद्योगांचा सन्मान राखत त्यांना अधिक चांगली आणि नियोजित कार्यस्थळे उपलब्ध करून देण्याचा विचार पुनर्विकास आराखड्यात करण्यात आला आहे. धारावीची विद्यमान सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक ओळख जपत तिचे सर्वंकष नागरी परिवर्तन करण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात होत असलेल्या नागरी परिवर्तनाचे हे आदर्श उदाहरण आहे.
धारावी पुनर्निर्माण प्रकल्प नेमका कसा असेल, आजची धारावी कशी आहे आणि भविष्यात तिचे स्वरूप कसे बदलणार आहे, याची 'रिअल टाइम' माहिती 'धारावी एक्सपिरियन्स सेंटर'मध्ये सर्वांना मिळणार आहे. पुनर्विकासानंतर आपले काय होणार, हा धारावीकरांच्या मनातील प्रश्न आणि त्यासंबंधीचा संभ्रम दूर करण्यासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. धारावीतील रहिवाशांना मिळणारी घरे, रस्ते, खुली मैदाने, सामाजिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे हे केंद्र नागरिक, हितधारक आणि देशभरातील नागरी नियोजनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.