औषधनिर्मिती प्रक्रियेतही अभियांत्रिकीचे मोठे योगदान  : प्रा. मीत्रगोत्री

औषधनिर्मिती प्रक्रियेतही अभियांत्रिकीचे मोठे योगदान  : प्रा. मीत्रगोत्री
  • Positive News
  • मे 9 2026

Share on  

औषधनिर्मिती प्रक्रियेतही अभियांत्रिकीचे मोठे योगदान  : प्रा. मीत्रगोत्री

वसंत व्याख्यानमालेत स्पष्ट केला औषध आणि अभियांत्रिकीचा संबंध 

नाशिक : शरीरात सोडलेली औषधं नेमकी कुठे पोहचतात आणि नेमके कसे काम करतात, हे एकदा समजले की ही संपुर्ण प्रक्रिया आपण समजू शकतो. खरेतर ही खुपच किचकट काम असते. त्यामुळे औषध निर्मितीमध्ये अभियांत्रिकीचे खुप महत्वपूर्ण योगदान असते. असे प्रतिपादन अमेरिकेतील हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधक प्रा. डॉ. समीर मित्रगोत्री यांनी येथे केले.
नाशिकचे वैभव आणि तब्बल 103 वर्षांची परंपरा असलेल्या  वसंत व्याख्यानमालेत स्व. माधवराव काळे स्मृती व्याख्यानात ते 'भविष्यकालीन औषधांचा शोध आणि विकास' या विषयावर बोलत होते. प्रायोजक के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, प्राचार्य श्री. नांदूरकर, कै. काळे यांचे पुत्र मंडलेश्वर काळे व धनंजय काळे व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते स्व. माधवराव काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. स्नेहल चौधरी यांनी प्रा. मित्रगोत्री यांचा परिचय करून दिला. व्याख्यानमालेचे पदाधिकारी मनीष सानप यांनी सत्कार केला. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. 
दरम्यान,  व्याख्यानस्थळी रोहिणी मैंद यांच्या चित्रांचे  प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला रसिक नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला. 
प्रा. मित्रगोत्री म्हणाले की, आपण सगळ्यांनीच कधी ना कधी औषध घेतो. पण ही औषधं नेमकी कसे काम करतात, हा प्रश्न आपण कधीच विचारत नाही. वस्तुतः औषध हे आपल्या जीवनातील खुप महत्वाचा आहे. खरे तर औषधं आणि इंजिनियरिंगचा दुरान्वयेही संबंध नाही असे आपण सर्वसामान्यपणे म्हणतो. परंतु प्रत्यक्षात मात्र औषध निर्मितीमधे इंजिनियरिंगचे खुप मोठे योगदान असते. जगभरात सर्वसामान्यपणे सर्वत्र आणि मोठ्याप्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या औषधांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे त्यांनी काही उदाहरणे आणि चित्रफितीच्या माध्यमातून औषध आणि अभियांत्रिकीचा प्रत्यक्ष आणि किचकट संबंध स्पष्ट केला. परग्रहावर संशोधन करण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा किमान दहापट अधिक खर्च एखादे नवीन औषध तयार करण्यासाठी येतो. यावरून लक्षात येईल की परग्रहावर जाणे जेवढे कठीण आहे, त्यापेक्षाही औषध बनविणे जास्त कठीण असते, असेही ते म्हणाले. दरम्यान, येत्या काळात अत्याधुनिक जैविक बदलांनुसार औषध निर्मितीतही मोठे बदल अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी शरीरात सुई न टोचता इंजक्शन देण्याचे तंत्र आणि त्यातूनच समोर आलेल्या संकल्पनांची उदाहरणे त्यांनी यावेळी दिली. 
---
*आठवणीतील लोकप्रिय गाण्यांची सजली मैफल*
व्याख्यानानंतर मयुर- विशाल प्रस्तुत 'हिटस् ऑफ 90'ज' ही  90 च्या दशकातील लोकप्रिय  हिंदी गितांची बहारदार मैफल रंगली. विशाल दाते, मयुर तुकाडिया, प्रियंका कोठावदे, रेणुका बायस यांनी एकापेक्षा एक सरस आणि लोकप्रिय गाण्यांच्या या मैफलीत श्रोते अक्षरशः तल्लीन झाले होते. अत्यंत लोकप्रिय व कर्णमधूर गीतांच्या या सादरीकरणास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
---
*आजचे (दि. 9) व्याख्यान*
1) वक्ते : रत्नाकर वाघ
विषय : गोदावरीपासून जागतिक महासागरापर्यंत : भारत, आफ्रिका आणि 21 व्या शतकातील नव्या संधी
2) एमएसएल कराओके क्लब प्रस्तुत 'तुम मुझे यूं भूला ना पाओगे'
3) शलाका मोहगावकर यांचे चित्रप्रदर्शन.

संबंधित बातम्या