प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासंदर्भात दीर्घकालीन व पर्यावरणपूरक धोरण सादर करावे
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरेनुसार व्हावे, यासाठी पर्यावरणाचा दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले व न्यायालयात टिकेल असे धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार राज्य शासनाने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागविला होता. आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हा अहवाल दिला असून त्यात काही शिफारसी करण्यात आल्या होत्या. खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासंदर्भात अभ्यास करणे आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करून न्यायालयासमोर बाजू मांडण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
तसेच सार्वजनिक गणेश विसर्जनानंतर समुद्र किनारे स्वच्छ करण्याची काळजी घेण्यासाठी ठोस उपाय आवश्यक आहेत, तसेच गणेश मूर्तीं तयार करताना पर्यावरणस्नेही सामुग्रीचा वापर व नैसर्गिक रंगाचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
या बैठकीला मंत्री ॲड. आशिष शेलार, राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, राज्याचे महाधिवक्ता, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रभारी सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.