बदलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! आता मेट्रोतून प्रवास करुन थेट मुंबई गाठा, 15 स्थानके अन् असा असेल मार्ग!
बदलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येतेय. ठाण्याच्या पुढे आता शहरीकरण वाढल्याने मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग मुंबईत कामासाठी येतात. मात्र लोकलमधील गर्दी वाढत चालल्याने आता नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. आता बदलापूरकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रोची निविदा निघाली असून मेट्रो 14च्या 38 किमी लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे.
कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रोच्या कामाची निविदा प्रसिद्ध झालीय. त्यामुळे मुंबई आणि बदलापूर ही दोन्ही शहरं आता लवकरच मेट्रोने जोडली जाणार आहेत. एमएमआरडीए कडून कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 च्या 38 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचं काम लवकरच सुरू होणार आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी तसच सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्वावर खाजगी क्षेत्रातील सहभागींची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरडीएनं ही निविदा प्रसिद्ध केलीय. या भागीदाराच्या माध्यमातून पाच वर्षात ही मार्गिका उभी होणार आहे. या प्रकल्पासाठी 14 हजार 898 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही मार्गिका सुरू झाली की दररोज 7 लाख प्रवाशांची ये-जा शक्य असेल. खाडी पार करून येणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो असेल.