हरित प्रकल्पांना आर्थिक बळ : ‘ग्रीन बाँड’द्वारे उभारलेला निधी शाश्वत विकासासाठी वापरणार

हरित प्रकल्पांना आर्थिक बळ : ‘ग्रीन बाँड’द्वारे उभारलेला निधी शाश्वत विकासासाठी वापरणार
  • Positive News
  • जून 10 2025

Share on  

हरित प्रकल्पांना आर्थिक बळ : ‘ग्रीन बाँड’द्वारे उभारलेला निधी शाश्वत विकासासाठी वापरणार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, फोर्ट, मुंबई येथे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हरित कर्ज रोख्यांचे (ग्रीन म्युनिसिपल बाँड) लिस्टिंग संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.

देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महानगरपालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हरित कर्जरोखे जारी केले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेने जारी केलेल्या हरित कर्जरोख्यांना जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गुंतवणूकदारांनी भरभरून या रोख्यांमध्ये गुंतवणूक केली. रोखे इश्यू झाल्यानंतर काही मिनिटातच ₹100 कोटींची गुंतवणूक यामध्ये करण्यात आली.  त्यानंतर पाच पटीने गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली. यावरून गुंतवणूकदारांचा हरित कर्ज रोख्यांवरील विश्वास दिसतो. या रोख्यांचा कालावधी 5 वर्षांचा असून त्यासाठी 7.85% स्पर्धात्मक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

शेअर बाजारात कर्जरोखे 'लिस्टिंग' करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. 'कॉर्पोरेट' अटी शर्तींची पूर्तता करीत 'लिस्टिंग'ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या निधीतून पायाभूत सोयी सुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. ही कामेही हरित पद्धतीची, पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाची असणार आहेत. केंद्र शासनाकडूनही हरित कर्ज रोखे इश्यू केल्यामुळे ₹20 कोटींचे प्रोत्साहनपर अनुदानही महापालिकेला प्राप्त झाले आहे. यासाठी महानगरपालिकेच्या संपूर्ण यंत्रणेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले.

हरित कर्ज रोख्यांविषयी माहिती :

हरित कर्ज रोख्यांद्वारे महानगरपालिकेने ₹200 कोटींचा निधी यशस्वीरित्या उभारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) च्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्ज रोखे इश्यु करण्यात आले होते. गुंतवणूकदारांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेला विश्वास अधोरेखित करत, इश्यू सुरु होताच केवळ एका मिनिटात ₹100 कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण ₹513 कोटींच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला 5.13 पट अधिक मागणी मिळाली. हरित कर्ज रोखे इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त संस्थाकडून 'एए +' (AA+) पतमानांकन प्राप्त झाले आहे. हरित कर्ज रोख्यातून उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक दरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. महेश लांडगे, आ. शंकर जगताप, आ. अमित गोरखे, आ. उमा खापरे, राज्याच्या मुख्य सचिव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या