मुंबईतल्या लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे चालवल्यानं खरंच अपघाती मृत्यू थांबतील?

मुंबईतल्या लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे चालवल्यानं खरंच अपघाती मृत्यू थांबतील?
  • Positive News
  • जून 11 2025

Share on  

मुंबईतल्या लोकल ट्रेनला स्वयंचलित दरवाजे चालवल्यानं खरंच अपघाती मृत्यू थांबतील?

मुंबई : सोमवारी 9 जूनला सकाळी साधारण 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कर्जत आणि कसरा ते CSMT अशा दोन दिशांनी आलेल्या रेल्वे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ बाजूबाजूला आल्या. तेव्हा धावत्या रेल्वेतून एकमेकांचा आणि बॅगांचा धक्का लागून 13 प्रवासी खाली रेल्वे रुळावर पडले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले.

पुन्हा एकदा मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या प्रवासाच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चिला जातो आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तीन लाईन्सवरुन धावणाऱ्या मुंबईच्या लोकलमधून दररोज दररोज सुमारे 63 लाख प्रवासी प्रवास करतात.

मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमधल्या 12 डब्ब्यांच्या एका ट्रेनची प्रवासी क्षमता साधारण 3 हजार 750 इतकी आहे. परंतु या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक प्रवासी दररोज रेल्वे लोकलमधून प्रवास करत असतात.

मागणी आणि पुरवठा (म्हणजे उपलब्ध असलेली जागा) यांचं प्रमाण व्यस्त असल्यानं प्रवास करताना होणारे मृत्यू ही कायम चिंतेची बाब राहिली आहे.

या अपघाती मृत्यूंची संख्याही हादरवणारी आहे.

गेल्या तीन वर्षांत साडेसात हजाराहून अधिक मृत्यू मुंबईच्या रेल्वेमार्गांवर झाले आहेत. मुंब्रा इथे जो अपघात सोमवारी झाला, त्या वळणावर पूर्वीही असे अपघात घडले आहेत.

सकाळी कार्यालयात जाताना आणि संध्याकाळी कार्यालयांतून परत घरी येताना, या दोन्ही टप्प्यांमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेन्समध्ये प्रचंड गर्दी असते.

त्या काळात डब्यांमध्ये आणि फलाटांवर किती प्रवासी असतात याचे असंख्य व्हीडिओ व्हायरल झाले आहेत आणि मुंबईबाहेरच्याही अनेकांनी बऱ्याचदा त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.

या काळात दरवाज्यांना धोकादायक पद्धतीनं लोंबकळत जाणारे प्रवासी हे चित्र प्रत्येकानं पाहिलं असेल.
त्यामुळेच मुंब्राच्या अपघातानंतर अपघाती मृत्यू थांबवण्याचे उपाय काय, हा प्रश्न पुन्हा विचारला गेला.

त्यावर रेल्वे प्रशासनानं तात्काळ दिल्लीत झालेल्या एका बैठकीत ठरवलं की मुंबईच्या नॉन-एसी लोकलनाही आता स्वयंचलित दरवाजे बसवले जावेत, म्हणजे प्रवासी दरवाज्यांना लोंबकळू शकणार नाहीत.

असे स्वयंचलित दरवाजे सध्या मुंबईत अत्यंत मर्यादित प्रमाणात धावणाऱ्या वातानुकूलित लोकलना आहेत. मेट्रोलाही ते असतात.

या स्वयंचलित दरवाज्यांमुळे हा प्रश्न सुटेल? अपघात टळतील? की गर्दीचा आकडा पाहता हा प्रश्न अधिकच अवघड होईल? हा रोगापेक्षा इलाज भयंकर होईल का?

मध्ये रेल्वेनं काय निर्णय घेतला?
मुंबईच्या अपघात घडल्यानंतर सोमवारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यसह रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर काही विभागांची बैठक झाली.

यामध्ये काही निर्णय झाले जे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले. त्यातला महत्वाचा निर्णय म्हणजे मुंबईच्या बिगर वातानुकूलित लोकलनही आता मेट्रोसारखे स्वयंचलित दरवाजे बसवणे.

तुलनेनं कमी संख्येनं धावणाऱ्या वातानुकूलित गाड्यांना असे दरवाजे आहेत. आता ते सगळ्याच गाड्यांना लावले जातील.

या स्वयंचलित दरवाजे असलेल्या बिगर वातानुकूलित लोकलचं डिझाईन करुन पहिला प्रोटोटाईप नोव्हेंबरपर्यंत चेन्नईत असलेली इंटेग्रल कोच फॅक्टरी तयार करेल आणि त्याच्या सर्व सुरक्षा चाचण्या, आवश्यक बदल झाल्यावर जानेवारी 2026 पर्यंत ही लोकल मुंबईत धावू लागेल, असं मध्य रेल्वेनं सांगितलं.
जेव्हा असं स्वयंचलित दरवाजे येतील, तेव्हा या लोकलच्या मॉडेलमध्ये अजून काही बदल असतील. हे दरवाजे आणि छत यांच्यामध्ये व्हेंटिलेशनची सोय असेल, कारण गर्दीत दरवाजे जर बंद असतील तर बाहेरुन हवा येणं आवश्यक आहे.

त्यामुळे दार बंद झाल्यावरही हवा खेळती राहील. त्यासाठी दरवाज्यांमध्ये लूव्हर्स असतील.

त्यासोबतच सध्या वातानुकूलित लोकलचे डबे जसे आतून जोडलेले आहेत, तसेच या नवीन लोकलचेही डबे तसे असतील. म्हणजे प्रवासी आत एका डब्यातून दुसऱ्यात ये-जा करु शकतील.

या नव्याने येणाऱ्या सगळ्या लोकल या वातानुकूलित असू शकतील असंही रेल्वेनं म्हटलं.

स्वयंचलित दरवाजे करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट हे आहे की प्रवासी दारापाशी थांबू शकणार नाहीत. त्यानं प्रवासादरम्यान पडल्यानं होणारे अपघात थांबतील अथवा कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या